लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या परिस्थितीचा एकूण आढावा घेऊन स्थानिक प्रशासनानेच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. कोरोना संक्रमणाची शक्यता कमी असणाऱ्या भागात शाळा सुरु करण्यास कुठलीही अडचण नाही.कोरोनामुळे शाळा आणखी काही दिवस बंद ठेवल्या तर शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे,असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.
येत्या सोमवारपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे शाळा सुरू करू नये,अशी भूमिका विविध संस्था संघटनांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच शिक्षकांबरोबर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी, असेही मत मांडले जात आहे. मात्र, याबाबत विशाल सोळंकी म्हणाले, शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या शाळेमध्ये शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे दिसून आल्यास स्थानिक प्रशासनाने संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याबाबत निर्णय घ्यावा. राज्यातील तब्बल पन्नास लाख विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करणे शक्य नाही.
राज्यातील ज्या भागामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे; तेथे उशिरा शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. परंतु, ज्या भागात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण नाहीत. त्या ठिकाणच्या शाळा सुरू करणे उचित ठरेल. सुमारे आठ महिन्यांपासून विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहिली तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, असेही सोळंकी यांनी सांगितले.