घोडेगाव : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिकांमार्फत सुरू आहे. अशी गावे निश्चित करून या गावांमध्ये ग्रामस्थ व शासकीय विभागांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निवारण व पुनर्वसनाचे नियोजन केले जाणार आहे. आंबेगाव तालुक्यात अशी १३ गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांची बैठक प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी घेतली. आंबेगाव तालुक्यात याचा सर्व्हे झाला आहे. यात जांभोरीची काळवाडी क्रं.१ व क्रं.२, फुलवडेची गणेशवाडी, भगतवाडी, माकडवाडी, बोरघर गावठाण, बोरघर काळवाडी, आहुपे साखरमाच, पोखरीची बेंढारवाडी, आसाणे, आमडे, दिगद, मेघोली, सावरली, साकेरी, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द अशी १३ गावे, वाड्यावस्त्या धोकाग्रस्त असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यातील जांभोरीची काळवाडी क्रं.१ व क्रं.२, पोखरीची बेंढारवाडी व फुलवडेची भगतवाडी ही तातडीची धोकाग्रस्त गावे असल्याचे भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सांगितले आहे. या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रांत अधिकरी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे यांनी या गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची बैठक घेतली. या वेळी समाजल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, माजी उपसभापती संजय गवारी, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे, पिंपरगणेचे उपसरपंच भीमा गवारी इत्यादी उपस्थित होते. धोकाग्रस्त गावांमधील ग्रामस्थांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही हालचाल लक्षात येताच प्रशासनाला याची कल्पना द्यावी. दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व शासनाच्या मदतीने सर्व उपयायोजना केल्या जातील. ग्रामस्थांची मागणी असेल तर आवश्यक गावांचे पुनर्वसनही केले जाईल. तसेच धोकाग्रस्त गावांमधील घरांची दुरुस्ती करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आर्थिक मदत केली जाईल. (वार्ताहर)
जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय
By admin | Published: December 06, 2014 4:09 AM