पुणे : शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ३२१ जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले होते. मात्र, त्याविरोधात निर्माण झालेल्या दबावापुढे झुकून आयुक्तांनी हा निर्णय फिरविला असून केवळ पिण्याचे पाणी वापरणारे तलाव बंद ठेवून उर्वरित जलतरण तलाव चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे सुधारित आदेश त्यांनी काढले आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एका दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, अचानक हा निर्णय त्यांनी बदलला आहे.शहरातील जलतरण तलावांना कशाचे पाणी वापरले, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व खासगी जलतरण तलाव सुरूच राहणार आहेत. जलतरण तलावांना प्रामुख्याने बोअरवेल, टँकरचे पाणी वापरले जाते; मात्र बहुसंख्य जलतरण तलावचालकांनी आपण विंधन विहिरींचे पाणी वापरत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडे केला आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या पाण्याचा वापर इतर आवश्यक कामांसाठी करता येऊ शकतो. मात्र, केवळ पिण्याचे पाणी वापरले जात असेल तरच तलाव बंद करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जलतरणपटूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ नये, याकरिता काही जलतरण तलाव सुरू ठेवण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र जलतरण संघटनेचे अध्यक्ष अभय दादे यांनी मुख्यमंत्री व आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.२१ तलाव बंदमहापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत असलेले २१ जलतरण तलाव मात्र जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.बंदचे आदेश नव्हतेशासनाने जलतरण तलाव बंद करण्याबाबत उचित निर्णय घ्या, असे निर्देश दिले होते; सर्व तलाव बंद करा, असे म्हटलेले नाही. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे तलाव बंद करण्याचा सुधारित आदेश काढण्यात आला आहे.- कुणाल कुमारआयुक्त, महापालिका
जलतरण तलाव बंदचा निर्णय अखेर फिरविला
By admin | Published: March 29, 2016 3:44 AM