पिंपरी : परदेशात पाठविलेला काळा पैसा परत भारतीय चलनात आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या बचत खात्यामध्ये १५ लाख ठेवू अशा पोकळ वल्गना करुन सत्तेवर आलेले भाजपा सरकार मागील दोन वर्षांच्या काळात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे, माध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी साप सोडून भुई धोपटण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणिबाणी लागू झाली आहे, असे पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे सचिन साठे यांनी सांगितले. हुकूमशाही पद्धतीने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेसह, शेतकरी, उद्योजक तसेच व्यापारी व्यावसयिकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. आगामी काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेताना सर्वसामान्य लोकांचा विचार झालेला नाही. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील महिनाभर बँकेमध्ये गर्दी होईल. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी या निर्णयाचा उत्पादन व सेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणिबाणी लागू झाली आहे. सर्वसामान्यांचे हाल होत आहे. (प्रतिनिधी)
अपयश झाकण्यासाठी घेतलेला निर्णय
By admin | Published: November 10, 2016 1:15 AM