ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. १८ - दादा आणि बाबा यांच्या जोडीमुळे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, भाजपा सरकारने यावर निर्णय घेतलेला आहे. बांधकामे नियमितीकरणाचा अहवाल न्यायलयासमोर ठेवला आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजित पवारांच्या हातात आहे, आणि त्या फोनमध्ये एक रूपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाज येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप होते. व्यासपीठावर खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, माजी विरोधीपक्षनेत्या उमा खापरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दुपारच्या उन्हात नेते आणि जनता सर्वच जण एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिकेत परिवर्तन निश्चित आहे. नेहमी नेते सावलीत आणि जनता उन्हात असते. मात्र, भाजपाच्या झेंड्याखाली सर्वचजण एकत्र आल्याने ही परिवर्तनाची नांदी आहे. भारतीय जनता पक्षाची विकासाची बॅक आहे. जनतेची बँक आहे. या बँकेत सामान्य माणसाने मत रूपाने ठेवलेले डिपॉडीट आम्ही पाच पट व्याजासह परत करणार आहोत. आपल्याकडे आणखी काही लोकांच्या बँका आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या बँकेत टाकलेले पैसे परत मिळत नाहीत. राहूल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची बँक अशी आहे, तिच्या कोठेही शाखा नाहीत. मताचे डिपॉझिट ठेवा विकास रूपाने व्याज परत करू.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने दिलल्या आश्वासनांनुसार अनधिकृत बांधकामे नियमितीकरण प्रश्न राज्य सरकारने निर्णय घेतलेला बांधकामे नियमित करण्याचे धोरण न्यायालयापुढे सादर केले आहे. तसेच आघाडी सरकारने लादलेला जिझीयाकर अर्थात शास्ती रद्द करण्यासंदर्भात जीआर काढलेला आहे. विकासाची दृष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला साथ द्यायला हवी.’’