- राजानंद मोरेपुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून, दिवसाआड एक ते दोन जणांना प्राणाला मुकावे लागत आहे. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने शहरात दररोज २ ते ३ अपघात होत आहेत. त्यात किमान चार जण जखमी होत असून त्यातील दोघा जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.मागील काही वर्षात शहरातील वाहनांची झपाट्याने वाढत चालली आहे. शहरातील वाहनांचा आकडा पुढील दोन-तीन महिन्यांत ४० लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात आलेले नाही. प्रामुख्याने वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघनच अपघातास कारणीभुत ठरत आहे. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणे वाहन चालविणे, मद्यप्राशन किंवा डॅगचे सेवन करून वाहन चालविणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, एकेरी रस्त्यावर विरूध्द दिशेने घुसणे, वाहनांना चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे या कारणांमुळे अपघात होत आहेत.अपघातांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शहरात एकुण ८६४ अपघात झाले. या अपघातांमध्ये २६५ जणांचा मृत्यू तर ५०३ जण गंभीर जखमी झाले. त्याचप्रमाणे २३६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरून दररोज सरासरी २ ते ३ अपघात होत असून त्यात दिवसाआड एक ते दोन जणांचा मृत्यू होत आहे. दररोज किमान दोघे जण अपघातात जखमी होत आहेत. अपघातातील गंभीर जखमींची संख्या मोठी आहे. या जखमींना अनेकदा कायमचेअपंगत्व येते. शहरातील अनेक किरकोळ अपघातांची पोलिसांकडे नोंदही होत नाही. त्यामुळे अपघातांचा आकडा यापेक्षा निश्चितपणे अधिक असेल.हेल्मेट घालून नियमभंगवाहतुक पोलिसांकडून हेल्मेटसक्ती सुरू केल्यानंतर हेल्मेट वापरणाऱ्या चालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, हेल्मेट घालून अनेक वाहनचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. वाहनाचा भरधाव वेग, सिग्नल तोडणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे हेल्मेटचा वापर सुरक्षित प्रवासाऐवजी केवळ दंडाचे पैसे वाचविण्यासाठी केला जातो, असेच चित्र आहे.अपघाताची प्रमुख कारणेवाहन चालविताना निष्काळजीपणामद्यप्राशन करून वाहन चालविणेवाहनाचा भरधाव वेगविरूध्द दिशेने वाहन चालविणेचुकीचे ओव्हरटेकिंगवाहन चालविताना मोबाईलचा वापर.मागील तेरा महिन्यांमध्ये जानेवारी २०१८ मध्ये सर्वाधिक ८३ अपघात झाले होते. यामध्ये २७ जणांचा मृत्यू तर ४७ जण गंभीर जखमी झाले. सर्वात कमी ५१ अपघात आॅगस्ट महिन्यात झाले. या अपघातांमध्ये २३ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले. यावर्षी जानेवारीमध्येही अपघातांचे प्रमाण कमी राहिले आहे. या महिन्यात एकुण ५७ अपघात झाले. त्यात १५ जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी झाले.
नियमभंग ठरतोय जीवघेणा, दिवसाआड १ ते २ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 12:45 AM