पुणे: शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहेच, ते लोकसभेच्या निवडणुकीत चांगले काम करत आहेत, विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू असे भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी निर्धारपुर्वक सांगितले. लोकसभेसाठी कोथरूड विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या साह्याने गिरीश बापट यांनी सर्वाधिक मताधिक्य देईल असे त्या म्हणाल्या.
बापट यांच्या प्रचाराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, शिवसेना या मतदारसंघात आमच्या बरोबरीने काम करते आहे. आमचे जनसंपर्क कार्यालयाच त्यांच्या इथे आहे. त्यामुळे युती पक्की झाली आहे. विधानसभेलाही ही युती कायम असेल. त्यावेळी पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करून. मात्र आत्ता विषय लोकसभेचा आहे. मागील वेळी अनिल शिरोळे यांना सव्वा तीन लाखांचे मताधिक्य होते. त्यातील ९० हजार मते कोथरूड मतदारसंघाची होती. त्यावेळेस फक्त २ नगरसेवक होते. आता युतीचे तब्बल २३ नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे मागील वेळेपेक्षा जास्त व सर्वाधिक मताधिक्य कोथरूडचेच असेल.
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने कोथरूड मतदारसंघात अनेक विकासकामे होत आहेत असे स्पष्ट करून आमदार कुलकर्णी यांनी त्याची माहिती दिली. चांदणी चौक उड्डाण पूल, मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एचसीएमटीआर रस्ता याबाबत त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातूनही कोथरूडच्या विकासासाठी चांगले काम होत आहे. याचा परिणाम म्हणून कोथरूडकर मतदार बापट यांनाच मतदान करतील असे त्या म्हणाल्या. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत बधे तसेच मिलिंद जोशी, राजेंद्र परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.