पुणे : तुमच्या नावाने मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत निरज सुरेंद्र पांडे (वय- ४७, रा. कोथरूड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, हा प्रकार ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीत घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये २५० ग्रॅम ड्रग्स असल्याने नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. पार्सल मुंबई क्राईम ब्रांच मध्ये असल्याने तुम्हाला मुंबईला यावे लागेल असे सांगितले.
तक्रारदार यांनी मुंबईला येऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर तुमचा कॉल मुंबई येथे सायबर सेलला जोडून देतो सांगितले. त्यानंतर स्काईप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या खात्यातील सगळे पैसे दिलेल्या बँक खात्यात पाठवा असे सांगून तक्रारदार यांना १३ लाख ७२ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले.
याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहे.