कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत 28 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णय बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्यात सोमवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. चर्चेतील सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सध्य परिस्थितीत परीक्षा घेणे अडचणीचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. परीक्षा घेण्याचा विचार केल्यास परीक्षेसाठी आणि मूल्यमापनासाठी लागणारा कालावधी ही सर्व प्रक्रिया होऊन निकाल जाहीर होण्यास किमान ऑगस्ट अखेरपर्यंत वेळ लागू शकतो,अशी चर्चा या वेळी करण्यात आली.
परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केल्यानंतर जून महिन्यात महाराष्ट्रातील सोळा लाख विद्यार्थी नियोजित केंद्रावर परीक्षा देण्यासाठी पोहोचतील का? त्यासाठी राज्यात एवढी समाधानकारक परिस्थिती असेल का? याबाबत कोणीही शाश्वती देऊ शकत नाही म्हणूनच परीक्षांचे आयोजन न करता शासनाने अध्यादेशानुसार विद्यार्थ्यांना योग्य न्याय देणारे मूल्यमापन करणे शक्य आहे. तसेच एसएससी बोर्डामार्फत परीक्षेच्या कामकाजाशी निगडित सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यामुळे परीक्षा घेण्याऐवजी याच पद्धतीने मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे व्यक्त करण्यात आली असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी कळवले आहे.
-----------------