पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये अनेकजण दारू पिऊन धिंगाणा; तसेच गोंधळ घालतात, असे कार्यकर्ते शिवभक्त असूच शकत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजयंतीच्या दिवशीही शहरात दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी संघटनांच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली.महापालिकेच्या वतीने शहरात दर वर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज विशेष बैठक बोलाविली होती. या वेळी शिवभक्तांनी ही मागणी केली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड, सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधीपक्ष नेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेवक रवींद्र माळवदकर या वेळी उपस्थित होते.शहरात राबविणार शिवमहोत्सव : महापौर शिवजयंतीनिमित्ताने घेतले जाणारे कार्यक्रम या पुढे शहराच्या चार झोनमध्ये घेण्याची घोषणा या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या वेळी केली. त्या अंतर्गत १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमानंतर, २५ जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्यात चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांसह मैदानी खेळांच्या स्पर्धा असतील. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त मंडळांना यात सहभागी होता येणार असल्याचे धनकवडे म्हणाले. तसेच, शनिवारवाडा येथे महाराजांच्या जीवनावरील महानाट्यही भरविण्यात येणार असल्याचे सांगून दारू बंदीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार असल्याचे महापौरांनी या वेळी स्पष्ट केले.
शिवजयंती ड्राय डे घोषित करा
By admin | Published: February 06, 2015 12:28 AM