कसबा विधानसभा शिवसेनेला सोडतो असे जाहीर करा, तरच काम करणार; ठाकरे गटाचा पवित्रा
By राजू हिंगे | Published: March 27, 2024 07:48 PM2024-03-27T19:48:31+5:302024-03-27T19:49:07+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पुण्यात महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाल्याचे पहायला मिळतय
पुणे: महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल असे जाहीर करा तरच लोकसभा निवडणुकीत काम करणार असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफुस आता पासुनच सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या शहर पातळीवरील नेत्यांची बैठक झाली. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, ॲड.अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
तेव्हा पळ काढू नका
पुणे लोकसभा मतदारसंघात कॉग्रेसचा उमेदवार उभा आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार तर मावळमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्त प्रचारासाठी बारामती आणि मावळ मध्ये जाउ नये. त्यांनी आताच प्रचारासाठी जावे. प्रचार जोमात आल्यानंतर या कार्यकत्यांनी पळ काढू नये. तसे केेले तर बारामती आणि मावळ मतदारसंघातील कार्यकर्तही पुण्याकडे येतील असा इशारा कॉग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत दिला.
विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणार
लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा निहाय निवडणुक कचेरी टाकणे, शहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे ,पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे आणि निवडुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.