----
भोर : एसटीच्या सेवेत असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली मदत द्यावी, एसटीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सन्मान करा, एसटी महामंडळाचे खासगीकरण करू नये यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने परिवहन मंत्र्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत सुमारे ८००० पेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून २६१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १ जून २०२० रोजी एसटीच्या वर्धापनदिनी परिवहन मंत्र्यांनी कोरोनाने मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केलेले होते. मात्र एकूण मृतांपैकी फक्त १० ते १२ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर विमा रक्कम प्राप्त झाली. उर्वरीत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप विमा कवचाची रक्कम मिळालेली नाही. जाहीर केल्याप्रमाणे सर्वच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवचाची रक्कम ५० लाख मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांनाप्रमाणे १४ दिवसांची विशेष रजा देणे आवश्यक आहे.
एसटी सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे धोरण असूनही मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिलेली नाही. ती तातडीने देण्यात यावी, कोरोनाने बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप देण्यात आलेली नाही. वैद्यकीय खर्चापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या परिपत्रक क्र.९/ ८७ पेक्षा जास्त फायदेशीर असणारी कॅशलेस योजना अंमलात आणल्यास कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त होईल.
कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाणे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे मान्य केलेले आहे. मात्र जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ कालावधीची ३ महिन्यांची २ टक्के महागाई भत्याची थकबाकी व जानेवारी २०१ ९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची ९ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्याची थकबाकी एसटीच्या कामगारांना अद्याप मिळालेली नाही. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१ ९ पासून ५ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने अदा केलेला आहे. मात्र सदरचा ५ टक्के वाढीव महागाई भत्ता कामगारांना अद्याप लागू केलेला नाही. ५ टक्के वाढीव महागाई भत्ता कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा दर ३ टक्के घरभाडे भत्ता ८ टक्के १६ टक्के २४ टक्के देण्याचे मान्य करून तसे संघटनेला लेखी पत्र दिले आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून मान्य केलेले आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताठे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली असल्याची माहिती पुणे विभागाचे अध्यक्ष मोहन जेधे यांनी दिली.
--
चौकट
१ जून २०२१ रोजी राज्यातील सामान्य जनतेच्या लालपरीची ७३ वर्षे पूर्ण होत असून करून ७४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अशा प्रसंगी महामंडळाने खासगी वाहतूकदारांकडून ५०० गाड्या (लालपरी) भाडे तत्त्वावर घेण्याच्या निर्णय घेतला आहे, हा निर्णय म्हणजे पुन्हा एकदा खासगीकरणाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. त्या निर्णयास संघटनेचा ठाम विरोध आहे. कोरोना प्रादुर्भावामध्ये एसटी कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.