मोमीन बुद्रुद्दीन / कवठे येमाईकवठे गावचे वैभव समजल्या जाणाऱ्या पुरातन राजवाड्याला आता उतरती कळा आली आहे. एकेकाळी संपूर्ण परिसराचा कारभार या वास्तूने पाहिला आहे, नव्हे तर अनुभवला आहे. इतिहासाची साक्ष असलेल्या या राजवाड्याची निर्मिती २५० वर्षांपूर्वी राजे यशवंतराव पवार यांनी केली. राजे यशवंतराव पवार पेशव्यांच्या सैन्यात सरदार म्हणून कार्यरत होते. शूर लढवय्या म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना जहागिरी वतन म्हणून कवठे सविन्दणे ही गावे मिळाली होती. या गावांचा संपूर्ण कारभार राजे यशवंतराव या राजभवनामधून पाहत होते. एक एकर परिसरात असेलल्या या वास्तूमध्ये राजवाड्याच्या चारी बाजूंनी भव्य असे चार बुरुज आहेत. राजवाड्याच्या आतमध्ये भव्य असा राजदरबार, राजमहल तसेच घोड्यांचा तबेला व दगडी बांधकाम असलेली विहीरसुद्धा आहे.राजवाड्याच्या विशाल दरवाजासमोर सुरक्षिततेसाठी एक भव्य असा दगडी बुरुजसुद्धा आहे. सध्या पवार राजे यांचे वंशज मध्य प्रदेश येथील धार या ठिकाणी वास्तव्यास आहे. नेहमी ते या ठिकाणी भेट देतात. सध्या ही वास्तू बंद असून भविष्यात या ठिकाणी भव्य असे वस्तूसंग्रहालय करण्याचा पवार कुटुंबीयांचा मानस आहे.
पुरातन राजवाड्याला लागली उतरती कळा
By admin | Published: May 05, 2017 2:02 AM