जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश आले आहे. येत्या ४ आॅगस्टला अधिकृत घोषणाच बाकी आहे. निवडणूक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांनी एक नवीनच फंडा अवलंबला असून, ग्रामपंचायतीच्या ११ उमेदवारांची निवड लकी ड्रॉ (सोडत) काढून करण्यात आली आहे. बेलसर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत असून, येथे कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्ष कार्यरत आहेत. या पूर्वी येथील सर्वच निवडणुका चुरशीच्या झालेल्या आहेत. सन २०१५ चीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी येथील आजी-माजी पदाधिकारी, युवकवर्ग, तसेच ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता. त्यासाठी सुरुवातीपासूनच सर्वांनी प्रयत्न केले होते. काल प्रयत्नांना यश आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वॉर्ड क्र. १ मधून संतोष जगताप, कैलास जगताप आणि पूनम जगताप, वॉर्ड क्र.२ मधून पांडुरंग जगताप, वनिता जगताप, वॉर्ड क्र.३ मधून सुजाता हिंगणे, स्वाती गरूड, प्रवीण बनकर, वॉर्ड क्र. ४ मधून युवराज शिंदे, सोनाली रसकर, कामिनी दोडके, असे केवळ ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गावातील बालसिद्धनाथ भैरवनाथ मंदिरात बैठका घेऊन रणधीर जगताप, माजी सरपंच विलास जगताप, बाळासाहेब जगताप, मारुती जगताप, नीलेश जगताप, धीरज जगताप, राहुल आबनावे, कैलास जगताप, मामा गरुड, हेमंत जगताप यांची समन्वय समिती स्थापन करून प्रयत्न सुरू केले. समितीने पुढील दोन बैठकांतून गावातील आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, शेती सोसायटी अध्यक्ष, सदस्य, यात्रा समिती, ग्राम शिक्षण समिती, व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती आदी पदांवरील उमेदवार व त्यांच्या घरातील उमेदवारांना संधी न देण्याचा निर्णय घेतला. तरीही ११ जागांसाठी इछुकांचे या समितीकडे ५९ अर्ज दाखल झाले होते. जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. रामदास शेळके यांच्या उपस्थितीत वॉर्डनिहाय सोडत घेण्यात आली. शनिवारी दि. १८ रोजी सोडतीने ११ उमेदवार निश्चित करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांचे, तसेच उमेदवारांचे अभिनंदन केले. निवडणूक यशस्वी पार पडावी म्हणून रणधीर जगताप, संदीप जगताप, संभाजी गरुड, धीरज जगताप, संतोष जगताप यांनी नियोजन केले होते. (वार्ताहर)
सोडत काढून उमेदवार निश्चित
By admin | Published: July 22, 2015 3:18 AM