पुणे: यंदा कोरोनामुळे पुस्तक, वही विक्रीत मोठया प्रमाणावर घट झाली आहे. दरवर्षी नववर्षाच्या डायरींच्या विक्रीत लाखोंची उलाढाल होत असते. यंदा विक्रेते डायरी विक्रीवर अवलंबून राहिले होते. पण नववर्षाच्या डायरी मागणीतही घट झाल्याचे विक्रेत्यांनी लोकमतला सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये अजूनही सुरू झाली नाहीत. त्यामुळे शालेय वस्तू, वह्या, पुस्तके, स्टेशनरी या गोष्टींची विक्री झाली नाही. म्हणूनच पुस्तक आणि वही विक्रेते नववर्ष डायरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला डायरी आणि कॅलेंडर विक्रीला सुरुवात होते. अनुपम, सुदर्शन, स्टार वन, आनंद, अशा डायऱ्या बाजारात उपलब्ध असतात. तर धार्मिक डायरीबरोबरच गृहिणी, प्रवासी, लॉ अशा डायऱ्यांना मागणी असते. एका दुकानातून ५ ते १० हजार डायरी विकल्या जातात. तर जवळपास बाजारात लाखोंची आर्थिक उलाढाल होते. विक्रेत्यांकडून मोठमोठ्या कंपन्या, ऑफिसेस एकाच वेळी मोठ्या संख्येने डायऱ्या घेऊन जातात. या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या मध्यापर्यंत असंख्य डायऱ्यांची विक्री होत असते. यंदा डायरी उत्पादनातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उत्पादकांकडून ५० टक्के साठा बाजारात आला आहे. त्यामुळे दुकानदारांकडेही दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात डायऱ्या उपलब्ध आहेत. तरीसुद्धा मागणीत वाढ दिसून येत नाहीये.
विक्रेते विशाल सावला म्हणाले, कोरोनामुळे आधीच व्यवसाय कमी झाला होता. दरवर्षी आतापर्यंत ५ हजार डायरी विक्री झालेली असते. पण यंदा आता दोनशे डायऱ्या विकल्या गेल्या आहेत. कंपनी आणि ऑफिसेस ने अजून कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नाही. नागरिक वैयक्तिक डायरी घेऊन जात आहेत. .......................आमच्याकडे ८० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत डायरी उपलब्ध आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने यंदा शालेय वस्तूंना मागणी नाही. दरवर्षी किमान महाविद्यालयातील तरुण मुले - मुली डायरी घेण्यासाठी येत असतात. तसेच मोठ्या संख्येने डायरी घेण्यासाठी कंपनी आणि ऑफिस कडून चौकशी केली जाते. पण यंदा आम्हीच त्यांना विचारत आहोत. तरीही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. दरवर्षी आमच्या सहा शाखातून ५० हजारच्या आसपास डायऱ्या विकल्या जातात. त्या तुलनेत यंदा ५० टक्के विक्री होणे अवघड वाटत आहे. - विनोद करमचंदानी, विक्रेते .........................दरवर्षी डायरीला मागणी असते. यावर्षी कोरोनामुळे बाजारात नववर्ष डायऱ्याचे प्रमाण कमी आहे. कंपनी यंदा कोणीही आलेच नाहीत. सगळे कोरोनाची कारणे देत आहेत. तसेच डिजिटलमुळेही डायरी वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले आहे. पंचांग, गृहिणी, रामदास, विवेकानंद अशा डायऱ्यांची वैयक्तिक विक्री होत आहे.- उत्कर्ष जोशी; विक्रेते