पुणे : केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर केले असून, देशातील विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अकराव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी नवव्या क्रमांकावर असणा-या पुणे विद्यापीठाची यंदा रॅंकिंग मध्ये दोन क्रमांकाने घसरण झाली आहे. पुणे विद्यापीठात देशातील शैक्षणिक संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विसाव्या क्रमांकावर असून, संशोधन क्षेत्रात पुणे विद्यापीठाने देशात ३७ वा क्रमांक मिळवला आहे.
देशातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत देशातील विद्यापीठांची नावे पहिल्या १०० ते २०० विद्यापीठांच्या यादीत यावीत, या अपेक्षेने केंद्र शासनाने एनआयआरएफ रँकिंग जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यानुसार २०२१ चे रँकिंग प्रसिध्द केले आहे.
संशोधन क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून स्वतंत्रपणे रँकिंग प्रसिध्द केले असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे देशात तिस-या क्रमांकावर आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दहाव्या क्रमांकावर होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट -मुंबई तेराव्या क्रमांकावर, आयसर-पुणे सोळाव्या क्रमांवर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी एकविसाव्या क्रमांकावर आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ३७ व्या तर विद्यापीठ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
---------
देशातील विद्यापीठांची क्रमवारी
1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
2) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
3) बनारस हिंदू विद्यापीठ
4) कलकत्ता युनिव्हर्सिटी
5) अमृता विश्व विद्यापीठ
6) जामिता मिलिया इस्लामिया
7) मनिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन
8) जाधवपूर युनिव्हर्सिटी
9) युनिव्हर्सिटी ऑफ हैद्राबाद
10 )अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी
11) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--------------------
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे परदेशी विद्यार्थी विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेत नाहीत. तसेच परदेशातील प्राध्यापकांनाही येथे येऊन प्रत्यक्षात शिकवणे शक्य होत नाही.त्यासाठी गुण असतात. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचे रँकिंग दोन क्रमांकाने खाली आले आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू होत नाही तोपर्यंत यात सुधारणा होणार नाही.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ