लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात जूनपर्यंत कोरोनाबाधितांची काळजी वाढविणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आजमितीला मोठ्या प्रमाणात घटले आहेत. जूनपर्यंत सलग तीन महिने दरमहा १६० च्या आसपास असणारी ही रुग्ण संख्या अवघ्या बारावर आली आहे. इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा बंद झालेला वापर आणि रेमडेसिविर इंजेक्शनची बंद झालेली मात्रा, यामुळे या बुरशीची लागण कमी झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे सांगणे आहे.
शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये सुमारे तिप्पटीने वाढ झाली होती. यापैकी ९७ ते ९८ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असले, तरी मध्यंतरीच्या काळात शहरात ऑक्सिजनची मागणी वाढली होती. ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने इंडस्ट्रियल ऑक्सिजन सर्वच रुग्णालयांना पुरविला. मात्र, वैद्यकीय वापरासाठी तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लॅंटमधील ऑक्सिजनच्या तुलनेत इंडस्ट्रियल ऑक्सिजनचे दुष्पपरिणाम दिसू लागले. ऑक्सिजन मास्क लावताना त्या ‘कप’ चा आहे तसा वापर व त्यात जमा होऊन राहिलेले बाष्प हे घातक ठरले.
दुसरीडकडे कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९०च्या खाली आल्यावर सर्रास वापरात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनचे अन्य दुष्परिणाम हे म्युकरमायकोसिसला आमंत्रण देणारे ठरल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. पण, या दोन्ही गोष्टींचा (इंडस्ट्रियल ऑक्सिजन व रेमडेसिविर) कोरोनाबाधितांवरील वापर जसा कमी होऊ लागला तशा प्रमाणात शहरातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमधील झालेली घट ही खूपच बोलकी आहे.
म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजेच एप्रिल २०२१ पासून १८ ऑगस्टपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या ५३३ इतकी झाली. यापैकी ३२३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली तर उपचाराअंती ३९८ रुग्ण बरे झाले. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण बाधितांपैकी ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट १
‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांची शहरातील आकडेवारी
महिना ---एकूण रुग्ण ---मृत्यू
एप्रिल ---१६८ ---१
मे ---१६१ ---१८
जून ---१५९ ---३२
जुलै ---२७ ----११
१८ ऑगस्टपर्यंत ---१२ -----४