पुणे : एड्स नियंत्रण विभागाकडून वर्षभर घेतले जाणारे जनजागृतीचे कार्यक्रम, समाजाचा काही प्रमाणात बदललेला दृष्टीकोन आणि लवकर निदान झाल्यामुळे घेतले जाणारे उपचार, यामुळे एचआयव्हीबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. २०१५ मध्ये एकूण २११५ रुग्ण आढळून आले होते. २०१६ मध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या १८२६ पर्यंत घटली आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत एचआयव्ही बाधित ३७० रुग्ण आढळले असून ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.एचआयव्ही रुग्णांबाबत जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या पार्श्वभूमीवर एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या एड्स नियंत्रण विभागाकडून वर्षभर जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. याविषयी लोकांचे असणारे अज्ञान दूर करण्याचाही प्रयत्न होत आहे. शहरात जानेवारी महिन्यात १२१ रुग्ण आढळले असून फेब्रुवारीत १०८, मार्चमध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या १४१ होती. जानेवारी ते मार्च या कालावधीत ४१५९ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले असून २९३९ नागरिकांची रक्ततपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १९१३ गर्भवती महिलांचे समुपदेशन व १८८९ महिलांची रक्ततपासणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात एड्सविषयी असलेली भीती, अज्ञान यांमुळे अचूक आकडेवारी नोंदवली जात नव्हती. त्यानंतर झालेल्या जनजागृती व उपायांमुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असल्याचे मत महापालिका एड्स नियंत्रण संस्थेचे नोडल आॅफिसर डॉ. सूर्यकांत देवकर यांनी व्यक्त केले. एचआयव्ही हा आजार असुरक्षित शारीरिक संबंध, एचआयव्हीबाधित रक्त, इंजेक्शनच्या दूषित सुया आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला होण्याची शक्यता असते. या आजाराचा संसर्ग रक्तामुळे पसरतो. एड्ससारख्या भयंकर आजाराने जगाला विळखा घातला आहे. योग्य उपचारांमुळे त्याचे प्रमाण कमी होत आहे. परंतु, त्या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज, न्यूनगंड, भेदभाव मात्र कमी झालेला दिसत नाही. यासाठी पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एचआयव्हीबाधितांच्या प्रमाणात घट
By admin | Published: April 20, 2017 7:05 AM