पुणे: देवीचा गोंधळ, जागरण गोंधळ, धर्मजागरण, या द्वारे समाजसेवेचे कार्य करणारे वाघ्या मुरळी लोक कलावंतांच्या कामाला सुरुवात झाली. परंतु कोरोनामुळे त्यांना बोलावणे कमी झाले असून, त्यांच्या मानधनही अर्धे झाले आहे.
राज्यात लोककलावंतांचे ३ हजार १०० संच आहेत. एका संचात पाच ते आठ याप्रमाणे १० ते १५ हजार लोककलावंत आहेत.
संचारबंदीच्या काळात गोंधळाचे कार्यक्रम होऊ शकले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने सर्व गोष्टी चालू झाल्या आहेत. तसेच मंदिरे उघडल्याने धार्मिक विधींनाही सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने गोंधळीशी संवाद साधला.
मुंबई विद्यापीठ शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक प्रा डॉ प्रकाश खांडगे म्हणाले,
लग्नसराईला सुरुवात झाली तरी वाघ्या मुरळी कलाकारांना बोलावण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या जागेअभावी या मंडळींच्या वावरण्यावर मर्यादा येत आहेत. लोक घाबरून या मंडळींना बोलवत नाहीत. त्यांच्या मनातून अजूनही कोरोनाची भीती गेली नाही. सध्याचा गोंधळाचा कार्यक्रम एक तासभरच चालतो.
..............................
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कलाकारांना शासकीय मदत मिळत आहे. कलाकारांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणीही झाली आहे. पण वाघ्या मुरळी लोककलावंतांचा त्याबाबत विचार केला जात नाही. कार्यक्रमात मिळेल त्या मानधनात या कलावंतांना काम करावे लागत आहे.
राहुल पवार, सरचिटणीस,
वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य
.............................
सध्या आठवड्यातून एखादे काम मिळत आहे. आमच्या संचात आठ लोक आहेत. कोरोनाच्या अगोदर एका कार्यक्रमाला १५ हजार मिळत असतील. तर आता ८ हजार मध्ये काम करावं लागते. यंदा अनेकांनी गोंधळाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
-राजेंद्र माळवे , गोंधळी
.................................
संचारबंदीत परिस्थिती फारच बिकट होती. आता कामाला सुरुवात झाली आहे. आठवड्यात दोन कामे मिळतात. आता मिळेल त्या मानधनात काम करावे लागते. गोंधळाच्या कार्यक्रमाला येताना पाच ऐवजी दोनच माणसे घेऊन या. असेही सांगितले जाते.
अनिल शिंदे, गोंधळी