लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने रुग्णवाढीच्या दरात घट झाली आहे. जिल्ह्याचा दर गेल्या आठवड्याच्या दुलनेत दोन टक्क्यांनी घटला आहे. सध्याचा दर १५.८३ असून गेल्या आठवड्यात हा दर १७ टक्के होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हा राज्यात सर्वाधिक २१.६६ टक्के आहे.
जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. यामुळे रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले होते. त्यात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने बाधितांचे हाल झाले. लॉकडाऊन असतानाही रोज बाधित आढळणाऱ्यांचा आकडा काही केल्या कमी होत नव्हता. मात्र, यात दोन आठवड्यापासून घट झाली आहे. पिंपरीतही हीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढत असले तरी त्यांचे प्रमाणही कमी होत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी बाधितांच्या दरात राज्यात आघाडीवर असलेला जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हळूहळू आटेक्यात येत आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) २३ हजार २४९ चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील ३ हजार १२७ जण कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सापडलेली रुग्णसंख्या ही कमी आहे. यामुळे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे.
चौकट
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दर राज्यात जास्त
देशांत सर्वाधिक कोरोना संख्या असलेल्या राज्यातही रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळाला आहे. राज्याच्या पॉझिटिव्हिटीचा दर हा ९.९६ टक्के आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हाचा दर सर्वाधिक २१.६६ टक्के आहे. त्या खालोखाल रत्नागिरी, सातारा, सांगली जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हा पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.
चौकट
जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर कमी
राज्यात अनेक जिल्ह्यानी कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवले आहे. त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधित सापडण्याचा दर २.२९ टक्के येवढा आहे. त्यापाठोपाठ गोंदीया, भंडारा आणि नंदुरबार जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर हा कमी आहे.