पुणे : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत २५ टक्के जागांवर आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे यंदा कोरोनामुळे शाळांच्या प्रवेशावर परिणाम झाल्याने आरटीई प्रवेशाच्या एकूण जागा घटणार आहेत. आत्तापर्यंत आरटीईच्या ८६ हजार २७९ जागांसाठी ७ हजार ९९० शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३५ हजाराने कमी आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून शाळांना येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शाळांनी नियोजित कालावधीत नोंदणी करावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, नोंदणीस शेवटचा एक दिवस बाकी असताना सुमारे १ हजार ६०० शाळांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सध्या राज्यातील ‘आरटीई’ ची प्रवेशक्षमता ८६ हजार दिसत असली तरी त्यात आणखी २० हजार जागांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा १ लाख जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मागील वर्षी आरटीई प्रवेशासाठी १ लाख १५ हजार जागा उपलब्ध होत्या.
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेल्याने काही पालक आपल्या पाल्याचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करण्याऐवजी चांगल्या मराठी माध्यमाच्या शाळेत करत आहेत. परिणामी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. आरटीईचे प्रवेश हे एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून असतात. त्यामुळे यंदा आरटीईच्या जागा कमी होणार आहेत.
---
जिल्ह्यातील तीन हजार जागा झाल्या कमी
मागील वर्षी आरटीई प्रवेशास नोंदणी केलेल्या पुण्यातील ९७२ शाळांमध्ये प्रवेशासाठी १६ हजार ९५० जागा उपलब्ध होत्या. परंतु, यंदा ९७३ शाळांनी नोंदणी करूनही केवळ १३ हजार ९९९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील सुमारे तीन हजार जागा कमी झाल्या आहेत.
---
शाळेत एकूण प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत २५ टक्के जागांवर आरटीईचे प्रवेश केले जातात. यंदा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने आरटीई प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये सुध्दा काही प्रमाणात घट होईल.
- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य