लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांवर स्टेराॅईड, रेमडेसिविर व अन्य औषधे, ऑक्सिजनच्या अतिवापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने व म्युकरमायकोसिसच्या धास्तीने जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मागणीत मोठी घट झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच एक रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळणे कठीण असताना मागणी घडल्याने आज जिल्हा प्रशासनाकडे तब्बल २७ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सचा साठा पडून आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. तसेच गंभीर रुग्णांची संख्यादेखील अधिक असल्याने हाॅस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होणे देखील कठीण झाले. यात बहुतेक सर्वच खासगी, सरकारी रुग्णालयांकडून सरसकट रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन्स देणे सुरू केले. यामुळे मागणीत प्रचंड वाढ झाली. एकट्या पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी तब्बल दहा ते अकरा हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सची मागणी होती. परंतु शासनाकडून पुणे जिल्ह्यासाठी सरासरी दीड ते तीन हजार इंजेक्शन्स व्हायल्स उपलब्ध होत असे. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळावीत यासाठी पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलनदेखील केले. शासनाच्या आदेशानुसार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यासाठी दिवसाला सरासरी चार ते साडेचार हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स उपलब्ध होतात.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शन्सचा, स्टेराॅईड व ऑक्सिजनचा अतिवापर झाल्याने पुण्यासह संपूर्ण राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सरासरी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आज अखेर हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही.
चौकट----
मागणी एक ते दीड हजारांवर
म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या, रेमडेसिविर इंजेक्शन्स वापराबाबत रुग्ण, नातेवाईक आणि हाॅस्पिटल्स यांच्यात निर्माण झालेल्या धास्तीने रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मागणी मोठी घट झाली आहे. पुणे जिल्ह्यासाठी दररोज चार ते साडे चार हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सचा पुरवठा होत असताना मागणी केवळ एक ते दीड हजार ऐवढीच आहे. यामुळेच आज अखेर जिल्ह्यात तब्बल २७ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स पडून शिल्लक असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.