भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील खेड घाटातील बाह्यवळण रस्ता ४.४ किलोमीटर लांबीचा आहे. तर नारायणगाव बाह्यवळण रस्ता ४.९ किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी नागरिकांकडून बाह्यवळण रस्ता बनविण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेतल्या होत्या. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पाठपुराव्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार सुरू होता. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या निरंतर पाठपुराव्याला खा . कोल्हे यांना अखेर यश आले आहे.
या संदर्भात खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण रस्त्याची मागणी केली जात होती. परंतु बाह्यवळण रस्त्यांचे काम तांत्रिक व कोरोना काळात लॉकडाऊन अशा अनेक अडचणींमुळे रखडले होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामांसाठी केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू होता. या बाह्यवळण रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांसह सर्वांची सुरक्षित वाहतूक सुरू होऊ शकणार असल्याचे मत खा. कोल्हे यांनी व्यक्त केले.
पॉइंटर
खेड घाट बाह्यवळण रस्ता : एकूण लांबी ४.४ किलोमीटर
नारायणगाव बाह्यवळण रस्ता : एकूण लांबी ४.९ किलोमीटर
दोन्ही बाह्यवळण रस्त्यांचे प्रकल्प खर्च : ७२ कोटी ८९ लक्ष रुपये (निविदा किंमत ९० कोटी रुपये)