पुणे : 'दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणामुळे पुन्हा पुन्हा मी इतिहासात जात आहे. पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर...?', अशी खंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी विना मोबदला जमीन दिलेल्या खिलारे कुटुंबाच्या सदस्य डॉ. नयना सोनवणे-खिलारे यांनी दीनानाथ रुग्णालय समाजमाध्यमांवर व्यक्त केली. सर्वत्र या पोस्टची चर्चा होत आहे.
डॉ. खिलारे यांनी लिहिले, ६ एकर जागा दिली पण...
पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिवंगत लता मंगेशकर या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये रुग्णालयासाठी जागेचा शोध घेत होत्या.
त्यावेळी अमृतराव खिलारे व स्व. काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती.
३ मात्र रुग्णालयात केवळ पैशांअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला, ही घटना वेदनादायक आणि निषेधार्ह आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जागेसोबत आमच्या लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत, कुटुंबातील सर्वांचं एक भावनिक नातं आहे. ती सहा एकर जागा आणि बाजूच्या सोसायट्या हा पूर्ण पट्टा आमची (खिलारे कुटुंबाची) शेती होती. आमचे काका अमृतराव आणि काशीस्वर खिलारे हे तिथे शेती करत होते. रुग्णालय उभं राहणार म्हटल्यावर त्यांनी जमीन देण्याच्या प्रस्तावास लगेच मान्यता दिली.
शरद पवार व विलासराव देशमुख हे माझे वडील पुण्याचे माजी महापौर दि. ज. खिलारे यांचे मित्र होते. त्यांची नेहमीच घरी ये-जा असे. लता मंगेशकर या पुणे शहरात हॉस्पिटलसाठी जागा शोधत होत्या तशी इच्छा त्यांनी शरदरावांना बोलून दाखवली. या सर्व गोष्टींची मी आणि सर्व खिलारे परिवार साक्षीदार आहोत. पुढे रुग्णालय बांधले गेले आणि काही वर्षांतच व्यवस्थापन ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. धनंजय केळकर यांच्या हातात गेले. या जागेचे मूळ मालक खिलारे कुटुंबातील माजी महापौर खिलारे यांची बायपास सर्जरी करण्यासाठी देखील लाखो रुपये बिल आकारले गेले.
त्यात डॉ. धनंजय केळकर यांनी स्वतःचे व्हिजिटिंग चार्जेस ६०० रुपये लावले होते. ज्या माणसाने कोटद्यवधी रुपयांची जागा रुग्णालयासाठी दान केली, त्या माणसाला भेटायलासुद्धा ते आले नाहीत. खंत इतकीच वाटते की विना मोबदला दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात आहे. तिथे सामान्यांचा नाहक बळी जातो. हे हसण्यावारी घेऊ शकत नाही. 'धर्मादाय'च्या नावाखाली चाललेली लूट आणि पैशांअभावी रुग्णाच्या मृत्यू है निषेधार्ह आहे.