कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:48 IST2025-04-11T09:46:24+5:302025-04-11T09:48:08+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे.

कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
पुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. २९ मार्च रोजी तनिषा भिसे (वय २७), ही सात महिन्यांची गर्भवती महिला उपचाराअभावी मरण पावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, 'कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. चांगल्या सेवा मिळाव्यात म्हणूनच शासनाकडून रुग्णालयाला निधी दिला जातो”
अजित पवारांनी स्पष्ट केलं की, “मुख्यमंत्री यांच्याकडे या प्रकरणाचा दुसरा अहवाल पोहोचला आहे. तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच पुण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा करतील.”
अजित पवारांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त केला मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान मोठे असल्याचे सांगत म्हटलं की, या कुटुंबाच्या पाचही भावंडांचं योगदान अत्युच्च आहे. महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्याबद्दल अपार आदर आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्यं करताना काळजी घ्यायला हवी.
निधी आणि प्रशासनावर
रुग्णालय हे धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली आहे. आम्ही सरकारी पैसे चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून देतो. तिसरा अहवाल येऊ द्या, एवढे पैसे हळदी-कुंकू पूजेसाठी ठेवलेत का, असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी रुग्णालय प्रशासनावर अप्रत्यक्षपणे टीका केली.