पुणे : व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात सिक्युरिटी म्हणून जबरदस्तीने कार ताब्यात घेऊन कर्जदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम लपविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, जामीन मंजूर झाल्यास आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी करीत नानासाहेब गायकवाड याची मुलगी दीपा गायकवाडचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला.
याप्रकरणी नानासाहेब गायकवाड, दीपा गायकवाड यांच्यासह राजू दादा अंकिश आणि नानासाहेब गायकवडच्या चालकावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत रमेश शिवाजी येवले (वय २७, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान आरोपीच्या औंध येथील घरी व सूस येथील फार्महाऊसवर घडली.
नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना व्यवसायासाठी २०१७ मध्ये दरमहा ४ टक्के व्याजाने २९ लाख रुपये दिले होते. त्यापोटी फिर्यादी दरमहा १ लाख ३६ हजार रुपये व्याज नानासाहेब गायकवाडकडे देत होते. मात्र व्याजाच्या मुद्दलाच्या सुरक्षेसाठी नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांची कार ताब्यात घेतली. त्यानंतर गायकवाडने फिर्यादी यांना त्याच्या घरी बोलावून गाडीच्या कागदपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या आरटीओच्या कोऱ्या टीटी अर्जावर व २५ लाख रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या आणि ती गाडी दीपा गायकवाडच्या नावावर करून घेतली. त्यानंतर काही दिवसांनी नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना जबरदस्तीने आपल्या फार्महाऊसवर नेऊन अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि कानाजवळ तीन गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी दीपा गायकवाडने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी त्यास विरोध केला. गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र व रोख रक्कम अर्जदार आरोपी दीपा गायकवाडने इतर ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.