पुणे : सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. मात्र, त्याच रात्री बुधवारी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजूनही तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़.
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मानकर बुधवारी सकाळी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. गेल्या आठवड्यात मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. तसेच पुढील १० दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश मानकर यांना न्यायमूर्ती कुरीन जोसेफ आणि न्यायमुर्ती संजय किशन कौल यांनी दिला होता. त्यानुसार मानकर शरण आले.
पोलिसांनी त्यांच्यासह इतरांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यांना बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश ए. एस, महात्मे यांनी मानकर यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर दीपक मानकर यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले. त्याच रात्री त्यांनी आपल्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड अधिक तपास करीत आहेत. त्यांनी सांगितले की, पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.