पुणे - माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे.न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी असमर्थता दर्शवल्याने आता हा अर्ज सुनावणीसाठी दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, अशी विनंती रजिस्ट्रार यांनी केली आहे. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पण याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने असमर्थता दाखविली. त्यानंतर मानकर यांनी दुसºया खंडपीठापुढे याचिका सादर केली होती. मात्र त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता मानकर यांना नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागणार आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाºया जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशीवाडी, घोरपडे पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानीनगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़ केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून दीपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे त्यांनी दुसºया खंडपीठाकडे अर्ज सादर केला होता. दुसºया खंडपीठानेदेखील त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली.