पुणे : याला काही काम येत नाही, पण सतत खायला मात्र पाहिजे, हे त्या येणा-या जाणा-यांना तसेच आपल्या अमेरिकेतील मुलाला सांगत असल्याने त्याचा राग येऊन किसन मुंडे याने दिपाली कोल्हटकर यांचा खून केल्याचे रविवारी स्पष्ट झाले़ किसन मुंडे याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर यांची हत्या केल्याप्रकरणी शनिवारी रात्री अलंकार पोलिसांनी किसन मुडे (वय १९, रा़ भूम, जि़ उस्मानाबाद) याला अटक केली़ किसन मुंडे हा केवळ तीन दिवसांपूर्वीपासून त्यांच्याकडे कामाला आला होता़ अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी दीपाली यांच्या आई आशा सहस्त्रबुद्धे यांचा सविस्तर जबाब नोंदविला़ त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कामाला असलेल्या कैलासच्या जागेवर किसन आला होता़ तो सकाळी डबा घेऊन येत असे़ त्याला काही स्वयंपाक करता येत नसल्याचे मत दिपाली यांचे होते़ तो त्यांच्याकडे जवळपास ११ तास रहात होता़ तरुण मुलगा असल्याने त्याला भूक लागत होती़ दुसरीकडे हे सर्व ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांचे मोजून मापून होते़ तो दिपाली यांच्याकडे खायला मागत असे़ त्या त्याला देत पण, देताना आता पुन्हा नाही मिळणार असे बजावत असत़ मंगळवारी त्याचा उपास होता़ त्यांनी त्याला उपवासाचेही खायला दिले़ सायंकाळी चहा करुन दिला़ बुधवारी रात्री जाताना त्याने पुन्हा चहा मागितला़ तेव्हा त्यांनी त्याला आमच्याकडे दोन वेळाच चहा होतो़ आता जाताना कशाला तुला चहा पाहिजे, असे दरडावले़ त्यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेहून दररोज न चुकता सकाळ, संध्याकाळ व्हिडिओ कॉलिंग करुन चौकशी करतात़ त्यावेळी दिपाली यांनी किसनविषयी याला काम तर काही येत नाही़ खायला मात्र पाहिजे, अशी तक्रार केली़ त्यांनी आपल्या आईला चार दिवसांचा तर प्रश्न आहे, असे सांगत समजावले़ गुरुवारी किसन दिवसभर त्यांच्याकडे काम करीत होता़ सायंकाळच्या सुमारास दिपाली स्वयंपाकगृहात होत्या़ त्यांच्या शेजारी राहणाºया बाई आल्या होत्या़ त्यांना कॉफी करुन दिली, आपल्याला नाही दिली, असे किसनला वाटले़ त्यांची आई आपल्या रुममध्ये टिव्हीवर तु माझा सांगाती ही मालिका पहात होत्या़ दिलीप कोल्हटकर यांना त्यावेळी खुर्चीत बसविले होते़ किसन याने दिपाली यांच्याकडे कॉफी मागितली़ त्यांनी त्याला नकार दिला़ त्यावर किसन याने तुम्ही अशा का वागता, असे म्हणाला़ त्याचा राग येऊन त्या किसनवर धावल्या़ तेव्हा किसनने त्यांचा गळा पकडून त्यांना ढकलून दिले़ हे पाहून दिलीप कोल्हटकर जोरात पाय आपटू लागले़ तेव्हा आशाताई यांनी बाबा काय झाले असे म्हणत रुमच्या बाहेर आल्या़ तेव्हा स्वयंपाकगृहाचे दार बंद होते़ किसन याने काकू (दिपाली) फोन करायला बाहेर गेल्या आहेत, असे सांगितले़ त्या स्वयंपाकगृहात जाऊ लागल्या़ तसे किसनने काकू आल्या की मी सांगतो, असे सांगितले़ जाहिराती संपल्याने त्या पुन्हा मालिका पाहू लागल्या़ तरीही त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या परत बाहेर आल्या़ तर किसनची पिशवी जागेवर नव्हती़ त्यांनी स्वयंपाकगृहाचे दार उघडले तर आतून धूर आला़ तेव्हा त्यांनी खालच्या मजल्यावर जाऊन तेथे राहणाºया मांडके यांना बोलावले़ त्यांनी लाईट लावून स्वयंपाकगृहात पाहिले तर त्यांना धक्काच बसला़ त्यांनी सोसायटीचे सचिव परांजपे यांना बोलावले़ त्यांनी आत येऊन पाहिले तर दिपाली या जळून गेल्या होत्या़, असे आशा सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या जबाबात सांगितले़
किसन मुंडे याने आपला गुन्हा कबुल केला असून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे अधिक तपास करीत आहेत़