पुणे : राष्ट्रपुरुष आमच्या हक्काचे, नाही कोणत्या जातीचे... भारत माता की जय... वंदे मातरम्.. शहीद विष्णू गणेश पिंगळे अमर रहे... अशा घोषवाक्यांद्वारे आणि दीप प्रज्वलित करून थोर क्रांतिकारक शहीद पिंगळे यांना दीपमानवंदना देण्यात आली. पिंगळे यांचे जन्मस्थान असलेल्या शिरूर तालुक्याचे नामकरण शहीद विष्णू गणेश पिंगळेनगर करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
वंदे मातरम् संघटनेतर्फे फर्ग्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. या वेळी इतिहास अभ्यासक मोहन शेटे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर उपाध्यक्ष आकाश गजमल, किरण राऊत, महेश बाटले, अमन अलकुंटे, संतोष देवकर, महेश ढोबळे, अक्षय सूर्यवंशी, नयन जोशी, अनिकेत साळुंके, अक्षय गजमल, आशुतोष शिंदे, प्रशांत शिंदे उपस्थित होते. मोहन शेटे म्हणाले, ‘विष्णू गणेश पिंगळे यांचे महाराष्ट्रात स्मारक नसावे ही दुर्दैैवी गोष्ट आहे. आपल्या देशात देशभक्तांनी दिलेल्या बलिदानाची किंमत नाही. प्राणांची बाजी लावून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिकारकांचा विसर पडत चालला आहे. अशा क्रांतिकारकांसाठी आता तरी जागे होऊ. विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू.’सर परशुराम महाविद्यालय, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड युनियन, शुक्रवार पेठ गगनगिरी मित्र मंडळ, वंदे मातरम् मित्रमंडळ, कर्वेनगर या ठिकाणी जनजागृती करण्यात आली.