पुणे : भिगवण परिसरात सांबर दिसल्यानं त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात यश आले. या सांबराची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. भिगवणहून कॅनॉलच्या मार्गाने हडपसरपर्यंत ते सांबर रात्रीच्या अंधारात आले. पण नंतर त्याला कालव्यातून वर येता न आल्यानं ते गोंधळून गेले. त्यात सकाळी आजूबाजूला लोकांचा कोलाहल ऐकून ते घाबरून गेले होते.
भिगवण, दौंड परिसरात असंख्य हरीण, सांबर, काळवीट आढळून येतात. पण ते शक्यतो लोकवस्तीत येत नाही. बारामती तालुक्यात त्यांच्यासाठी अभयारण्य तयार करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून सध्या कालव्यातील पाणी बंद केल्याने कालवा कोरडा पडला आहे. दौंड, भिगवण भागात हे सांबार रात्री कोठेतरी कालव्यात पडले. कालवा कोरडा असल्याने त्याला वर येता येत नव्हते. त्यामुळे कालव्यातून थेट हडपसरमधील सातववाडी, उन्नतीनंतर परिसरात आले. सकाळी जेव्हा येणा-या जाणा-या लोकांना कालव्यात हे सांबर दिसले. तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली. अग्निशामक दलाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. पाठोपाठ वन विभागाचे कर्मचारी, कात्रज प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी आले. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील रेस्क्यू सेंटरच्या अधिका-यांनी डॉट मारुन सांबाराला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण ते बेशुद्ध झाले नाही. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये पकडले. त्याच्या तोंडाला थोडीशी जखम झाली असून त्याची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. तेथे त्याची तपासणी करुन उपचार करण्यात येणार आहेत.