पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात आली. मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ठराविक प्रवेश पात्र मानकरी, टाळकरी यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरातही विधी करण्यात येत आले. या वेळी कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी ,सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व फुलांनी सजवलेल्या पालख्यांमध्ये उत्सवमूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धूप आरती झाल्यावर छबिन्याला सुरुवात झाली. वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या व पालख्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगितली.
मृगाचा पाऊस चार खंडांत पडेल. बाजरीचे पीक चांगले येणार असून, मगा दोन खंडात व उत्तरा पूर्वा चार खंडात पडून शेतकरी समाधानी होईल. हत्तीचे पाणी चार खंडात समाधानकारक पडणार आहे. जनतेचे समाधान होईल उत्तर पूर्वा पाऊस तीन खंडात पडेल. ़रोगराई जनावरांना नसून माणसामागे आहे अशा प्रकारे परंपरेने भाकणूक झाली. भाकणूक झाल्यावर पालखीच्या तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
भाकणुकीसाठी मंदिरामध्ये प्रवेश पात्र मानकरी, सालकरी, दागिनदार मंडळी उपस्थित होते. शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरात विधी करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी.