लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एक हरीण मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास वारजे-माळवाडी खिंडीतील एका पंधरा फूट खड्ड्यात पडल्याने जखमी झाले. हरणाचा मागील पायाला जखम झाली असून, रेस्क्यू संस्थेच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान, वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी या हरणाला खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढले.
वारजे परिसरात रामनगर भागातून हे हरीण रस्त्यावर आल्याचा अंदाज आहे. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास ते भटकले आणि वारजे पुलावरून खाली उडी मारली. डांबरी रस्ता असल्याने पायाला जखम झाली आणि पुढे जाताना जलवाहिनीसाठी तयार केलेल्या खड्ड्यात ते पडले. या हरणाला तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिले आणि अग्निशमन दलाला काॅल केला. त्यानंतर लगेच घटनास्थळी दलाचे तांडेल शिवाजी मुजुमले, चालक सतीश देशमुख, फायरमन शिवाजी आरोळे, जवान संतोष नलावडे पोचले. यांनी सुमारे दोन तास तिथे थांबून हरणाला खड्ड्यातून बाहेर काढले. या वेळी वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमचे सदस्यही मदतीला आले.
तांडेल मुजुमले म्हणाले, आम्ही काॅल आला की, तिथे पोचलो. हरीण खूप घाबरट असते. म्हणून अगोदर शांतपणे त्याच्यावर नजर ठेवली. मग हळूहळू त्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. कारण घाबरून त्यांचे हृदय बंद पडू शकते. चार वाजता त्याला जाळीत पकडून उपचारासाठी पाठवले. सुमारे ३०-३५ फुटांवरून उडी मारल्याने त्याच्या मागील पायाला लागले होते. डांबरी रस्त्यावर उडी मारल्याने त्याला जखम झाली असणार, खड्डाही सुमारे १५ फूट खोल होता.
--
हरणाला सुखरूप रेस्क्यू केले आहे. त्यावर उपचार सुरू असून, मागील पायाला लागले आहे. काही दिवस उपचार झाल्यावर ते चालू शकणार आहे. अग्निशमन दल, वन विभागाने आम्हाला खूप मदत केली म्हणून हरणाचे प्राण वाचले.
- अभिजित महल्ले, सदस्य, रेस्क्यू संस्था