वारजे गणपती माथा परिसरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हद्दीतून दुपारच्या दरम्यान मानवी वस्तीत आलेल्या एका मादी जातीच्या हरणाची स्थानिक नागरिक, पोलीस व वनविभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. हे हरीण सैरभैर झाल्याने इकडेतिकडे धावत होते. त्याला पकडून उपचारासाठी रेस्क्यू टीमकडे सुपूर्द केले.
गणपती माथालगत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हद्दीतून सोमवारी दुपारच्या सुमारास एक हरीण वाट चुकल्याने ते सैरभैर धावत असल्याचे वाहतूक पोलीस अमोल सुतकर यांना दिसले.
वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, या नागरिकांचा गोंधळामुळे ते घाबरलेले हरीण गणपती माथा बस स्टॉपमागील एका सोसायटीमध्ये घुसले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारजे पोलिसांशी संपर्क साधला आणि माहिती दिली. घटनास्थळी आलेले उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी अमोल सुतकर, अर्जुन थोरात यांनी तसेच स्थानिक तरुण नवनाथ चव्हाण, पैगंबर शेख व काही नागरिकांच्या मदतीने हरणाला काळजीपूर्वक पकडले तसेच पाणी पाजून ते घाबरून जाऊ नये डोळ्यावर कापडी पट्टी बांधली. वाहनांचा आवाज व बघ्यांच्या गर्दीने भेदरलेले हरीण काही वेळाने शांत झाले.
दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेले वन विभागाचे ॲनिमल रेस्क्यू टीमने हरणाची तपासणी करून त्याला घेऊन गेले. भूगाव येथे योग्य उपचार करुन हरणाला वनविभाग हद्दीत सोडण्यात आले.