पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल; इंग्लडमध्ये केलेले वक्तव्य पडले महागात
By नम्रता फडणीस | Published: April 13, 2023 02:59 PM2023-04-13T14:59:30+5:302023-04-13T15:03:14+5:30
न्यायालयात दि. 15 एप्रिल रोजी या तक्रारीवर सुनावणी आहे...
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध इंग्लडमध्ये केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन पुणे न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरूद्ध सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. न्यायालयात दि. 15 एप्रिल रोजी या तक्रारीवर सुनावणी आहे.
सत्यकी सावरकर म्हणाले की, गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये राहुल गांधी असं म्हणाले होते की सावरकरांनी पुस्तकात लिहिले आहे की ते आपल्या पाच ते सहा मित्रांच्या मदतीने एका मुस्लीम व्यतीला मारहाण करीत होते. हे पाहून सावरकरांना आनंद झाला. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबतीत ज्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. हा प्रसंग काल्पनिक असून, सावरकर असे लिहूच शकत नाहीत. सावरकरांचं म्हणणं होतं की कुठल्याही व्यक्तीला जातधर्माच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. सर्व व्यक्ती समान असायला पाहिजे. आपले धर्मग्रंथ आदरणीय आहेत पण आचरणीय नाहीत. असे सावरकारांचे विचार होते. त्यामुळे गांधी यांनी केलेले वक्तव्य हा भा.दं.वि 499 आणि 500 कलमानुसार हा फौजदारी स्वरुपाचा बदनामीचा गुन्हा आहे. न्यायालयाने आम्हाला दि.15 एप्रिल ची तारीख दिली आहे. त्यादिवशी केस नंबर मिळू शकेल.
ते म्हणाले, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी काहीही वाचले नाही. न वाचता ते सावरकरांविरूद्ध विधान करीत आहेत. त्यामुळे आम्ही सावरकर कुटुंबीय खूपच व्यथित आणि संतप्त झालो आहोत. कधीतरी हे थांबेल असे वाटले होते. पण सातत्याने राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक हे सावरकरांविरूद्ध वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे आता न्यायालय काय तो निर्णय घेईल. राहुल गांधी यांना असं कोणतं पुस्तक आहे त्याचा पुरावा द्यावा
लागेल अन्यथा शिक्षेला सामोरे जावे लागेल.