पुणे: विवाहानंतर तीन महिन्यांतच डॉक्टर तरुणीचा अभियंता असलेल्या पतीकडून कौटुंबिक छळ करण्यात आला. छळामुळे ती आई-वडिलांकडे राहत असताना पतीने तिची आणि तिच्या आईची सोशल मीडियावर बदनामी केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २८ वर्षांच्या डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, किशोर लगे (रा. संगमनेर, अहमदनगर) याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचा जानेवारी २०२१ मध्ये विवाह झाला होता. जेमतेम तीनच महिने त्यांचा संसार टिकला. पती सातत्याने संशय घेत होता. फिर्यादी यांनी काम सोडले नाही तर मारून टाकण्याची धमकी देत होता. तसेच मैत्रिणीजवळ तिची बदनामी करत होता. त्यामुळे फिर्यादी माहेरी निघून आल्या. दरम्यान, त्याने फिर्यादी आणि तिच्या आईचे फेसबुकवर बनावट खाते उघडले. यानंतर दोघींची समाजमाध्यमावर बदनामी सुरू केली. ही बाब फिर्यादीस कळताच तिने पोलिसांत धाव घेतली. पोलिस निरीक्षक विजय पुराणिक तपास करीत आहेत.