पुणे : काहीच दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसेच्या ध्वजावर असलेल्या राजमुद्रेला काढण्याबाबत मागणी केली होती. राजमुद्रा ही कोणा एकट्या पक्षाची मक्तेदारी नसून ती संपूर्ण स्वराज्याची आहे असं मत गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. मात्र राजमुद्रा वरून पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. यावेळी तर मनसेनं चक्क क्रिकेटच्या बॅटवरच राजमुद्रा कोरली आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेकडून ५०० बॅटचे वाटप होणार आहे. यामध्ये बॅटवर राजमुद्रा कोरलेली आहे. आता त्याच बॅटने मुलं खेळणार आणि राजमुद्रेची वारंवार विटंबना होणार, असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येतोय.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या प्रकरणी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "राजमुद्रा हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. तिची अशा पद्धतीने पक्षाच्या नावावर केली जाणारी हेळसांड योग्य नाही. राजमुद्रा हा राजकीय भांडवलाचा विषय नसून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा मानबिंदू आहे. राजमुद्रेची विटंबना थांबवावी."