पुणे : जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी समीर बाळू निकम (रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने समीर निकम याच्याविरुद्ध मारहाण करुन बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्यात समीर याला अटक झाली होती. त्यातून तो जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर डिसेंबर २०२१ पासून तो पुन्हा या महिलेला त्रास देऊ लागला. फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी येऊन तुझा मुलगा माझा आहे. तो मला दे, नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दिली. त्याकडे या महिलेने दुर्लक्ष केल्यावर त्याने या महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीशी संबंधित असलेला बदनामीकारक मजकूर फेक फेसबुक अकाऊंटवर टाकला. तसेच त्या अकाऊंटवरुन या महिलेच्या नातेवाईक व इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यावर अश्लिल शेरेबाजी करुन या महिलेची बदनामी केली. या महिलेच्या मित्रमैत्रिणीला फोन करुन तिची बदनामी केली. पतीचा पाठलाग करुन त्यांना ‘‘मी आता तुमची इज्जत घालवून टाकणार आणि तुझ्या पत्नीला मारुन टाकणार आहे. जर तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे. तुम्ही मला मारुन टाका, नाही तर मी स्वत:च आत्महत्या करतो आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून तुम्हाला अडकून टाकणार. मी तुम्हाला त्रास देणार आणि तुमची बदनामी करणार’’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.