पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:53 PM2020-03-06T13:53:26+5:302020-03-06T13:53:58+5:30

महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव

Defeat of Mahavikas aaghadi in the election of the standing committee chairman in pune | पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

Next
ठळक मुद्देभाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने रासने यांचा होता विजय निश्चित

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची बहुमताने निवड करण्यात आली. रासने यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव केला. रासने यांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे. 
स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत संपल्याने यावर्षीच्या (२०२०-२१) अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. अर्ज मागे घेण्याकरिता १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. आधी पठारे यांच्याकरिता मतदान घेण्यात आले. त्यांच्याबाजूने महाविकास आघाडीची सहा मते पडली. तर रासने यांच्या बाजूने दहा मते पडली. बहुमत रासने यांच्या बाजूने असल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी विजयी घोषित केले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. निवडणुकीपुर्वीच रासने यांचा विजय गृहीत धरुन पालिकेच्या बाहेर ढोल-ताशे वाजविण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे हे आमदार झाल्याने पक्षाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या जागी रासने यांची वर्णी लागली होती. तीन महिने अध्यक्षपद भुषविलेल्या रासने यांनी नुकतेच सन २०२०-२१ चे ७ हजार ३९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. पुढील वर्षीचे (२०२१-२२) चे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी त्यांनाच मिळणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, खासदार गिरीश बापट, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, नगरसचिव सुनील पारखी, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते. 
..........

Web Title: Defeat of Mahavikas aaghadi in the election of the standing committee chairman in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.