पिंपरी : मोदी लाट आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे महापालिका निवडणुकीत २०१७ ला पराभव पत्करावा लागला. महापालिकेतील बहुमताच्या जोरावर चुकीची कामे सुरू आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार असून ढेपाळलेली संघटना अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. मागील चुका टाळून कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे सभागृहात झाली. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधीपक्षनेते पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.
पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालीकेेत अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. आज जो काही शहरात विकास पाहायला मिळतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे. आम्ही सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही.उलट सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचेच सर्व विकास कामे मार्गी लावली. मात्र भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहने जाळणे, तलवारी घेऊन फिरणे, दहशत माजविणे असे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करताना आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुंडगिरी मोडीत काढताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यायला हवेत असेही पवार यावेळी म्हणाले.