पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार गावच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३९ उमेदवार उभे होते. नीरा विकास आघाडीचे १० सदस्य, भैरवनाथ पॅनेलचे ३ तर चव्हाण पॅनेलचे ४ सदस्य निवडून आले आहेत. चव्हाण पॅनेलचे प्रमुख व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण यांना नीरा विकास आघाडीचे प्रमुख व माजी सरपंच राजेश काकडे व माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे यांनी पराभूत केले आहे.
नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मधून चव्हाण पॅनेलचे अनिल लक्ष्मणराव चव्हाण, प्रमोद बाबूराव काकडे तर नीरा विकास आघाडीच्या राधा राजू माने. प्रभाग २ मधून नीरा विकास आघाडीचे अभिषेक भालेराव, वैशाली प्रल्हाद काळे, माधुरी सुजीत वाडेकर. प्रभाग ३ मधून चव्हाण पॅनेलचे सुनील लक्ष्मणराव चव्हाण व जुबीन मुनीर डांगे. प्रभाग ४ मधुन नीरा विकास आघाडीचे राजेश अशोक काकडे, शशिकला विजय शिंदे, तेजश्री विराज काकडे. प्रभाग ५ मधून भैरवनाथ पॅनेलचे संदीप मुगुटराव धायगुडे, वैशाली सुदाम बंडगर, वर्षा संदीप जावळे. प्रभाग ६ मधुन नीरा विकास आघाडीच्या सारिका दिपक काकडे, अनंता नारायण शिंदे , प्रियंका सागर झुंजूरके विजयी झाले आहेत.
पुणे जिल्हा व पुरंदर तालुक्याचे नीरा येथील प्रभाग ४ च्या निवडणुकीवर लक्ष लागून राहिले होते..जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ताजीराव चव्हाण यांनी नीरा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. चव्हाण यांना माजी सरपंच राजेश काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी थेट लढत देत शंभरच्यावर मतांनी धुळचारली. राजेश काकडे यांना ५६६ तर दत्ताजीराव चव्हाण यांना ४६५ मते मिळाली.
नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जल्लोष साजरा करताना माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी सरपंच व नवनियुक्त सदस्य राजेश काकडे व नीरा विकास आघाडीचे युवक. (छाया : भरत निगडे, नीरा)