उरुळी कांचन : महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या आदेशालाच उरुळी कांचन उपविभागाने हरताळ फासून जनतेला सुमारे ३ तास तेही ऐन दिवाळीत धनत्रयोदशीला अंधारात ठेवून अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया सणाच्या दिवसात एक पराक्रमच केला!या दीपावलीच्या काळात कोणालाही अंधारात राहावे लागणार नाही, अशी ग्वाही पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी दिली असताना धनत्रयोदशी या दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवशी उरुळी कांचन उपविभागातील कर्मचाºयांनी सायंकाळी ५च्या सुमारास वीजपुरवठा बंद केला तो सुमारे ७.३० वाजेपर्यंत. सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीत मुहूर्ताच्या वेळी कराव्या लागणाºया महत्त्वाच्या पूजेच्या वेळी अंधारातठेवून त्यांची मोठी गैरसोय करूनठेवली व जनतेची नाराजी ओढवून आपल्या वरिष्ठ अधिकाºयाच्या आदेशालाच वाटण्याच्या अक्षता लावल्या!तसेही दररोज दिवसात कधीही व कितीही वेळा पाच ते दहा मिनिटांचा वीजपुरवठा बंदचा झटका या भागातील वीज ग्राहकांना सहन करावा लागतच आहे.जाणीवपूर्वक व टिकाऊ स्वरूपाची दुरुस्ती व नियमित देखभाल करणे गरजेचे असताना दिखाऊ व तकलादू काम केले जाते, अशी खंत या भागातील वीज ग्राहक व्यक्त करीत आहेत.उरुळी कांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. साबदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की या कार्यालयाअंतर्गत २ ट्रान्सफॉर्मर दोन ते तीन दिवसांपूर्वी जळाले होते. त्यांचा लोड इतर ट्रान्सफॉर्मरवर विभागून टाकून वीजपुरवठा चालू राहील, याची दक्षता घेतली होती. पण, दिवाळी असल्याने विजेचा वापर वाढल्याने आणि भविष्यातील वीजवापर सणासुदीच्या काळात खंडित होऊ नये, म्हणून ते दोन ट्रान्सफॉर्मर बसविणे गरजेचे होते. ते ताब्यात मिळण्यास उशीर झाल्याने काम चालू करण्यास उशीर झाला व सायंकाळी अर्धवट काम ठेवून वीजपुरवठा चालूही करता येईना. म्हणून नाइलाजाने जनतेला अंधारात राहावे लागले.
मुख्य अभियंत्यांच्या आदेशाला हरताळ, उरुळी कांचन महावितरण उपविभागाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 2:19 AM