'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:05 PM2022-05-17T13:05:56+5:302022-05-17T13:09:56+5:30
जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले
पिंपरी : तथागत गौतम बुद्ध यांनी क्षमा, शांती, त्याग आणि सेवा-समर्पणाचा संदेश दिला. महाराष्ट्राला गौतम बुद्धांच्या या शिकवणीची गरज आहे. साधू-संतांचे विचार सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक असताना आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे, अंतर पाडण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. मात्र, हे प्रयत्न जनतेनेच हाणून पाडायला हवेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी च-होलीत केले.
च-होली-वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) उभारलेल्या प्रशिक्षण संकुलातील कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, रामेतीचे प्राचार्य विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, 'राज्यातील कायदा-सुव्यवस्था राहण्याकरिता मुख्यमंत्री, गृहमंत्री मनापासून प्रयत्न करीत आहेत. अधिकारी वर्गाची त्यांना साथ लाभते. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. कृषी विभागाला सन २०२२-२०२३ मध्ये ३ हजार ३५ कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. कृषी आणि संलग्न संस्थांसाठी २३ हजार ८८८ कोटींची तरतूद केली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांसोबतच कृषी संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देऊन कृषी विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यातून हिंगोली येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधनाकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय चांगली घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.