आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:05 PM2024-06-05T12:05:23+5:302024-06-05T12:07:06+5:30
शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले....
पुणे : बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघावरही सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ, त्यातच उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात केलेला प्रवेश कार्यकर्त्यांना रुचला नाही. शिवाय शरद पवारांना मिळालेली सहानुभूती यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा शिरूरचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
२०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले होते. मतदारसंघामध्ये जनसंपर्कही वाढवला. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे उमेदवारीसाठी आढळराव-पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांच्याबरोबर मूळ शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे गटातच राहिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतही फूट पडली. आणि अजित पवार महायुतीत सामील झाले. जागावाटपावेळी अजित पवार यांनी शिरूरच्या जागेवर दावा सांगितल्याने आढळराव-पाटील यांची मोठी गोची झाली होती.
अखेर तडजोडीअंती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. या पक्षांतरामुळे कार्यकर्ते नाराज झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आढळरावांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाच पण भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनाही हे निर्णय रुचले गेले नाही. आमदार मोहिते-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे सख्ख सर्वांना माहीत आहे. सुरुवातीला मोहितेंनी केलेल्या विरोधामुळे कार्यकर्तेही चार्ज झाले होते. पण कालांतराने मोहिते-आढळराव यांच्यात दिलजमाई झाली पण कार्यकर्ते मात्र, तिथेच राहिले. त्याचा फटकाही आढळराव-पाटील यांना बसला.
दुसरीकडे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही सुरुवातीला आढळराव पाटील यांना साथ दिली. दरम्यान, त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते रुग्णालयात गेले. निवडणुकीपासून ते दूर झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या खऱ्या पण कार्यकर्त्यांनी काही फारसे मनावर घेतले नसल्याचे दिसले. वळसे-पाटील यांचे कट्टर समर्थकही अमोल कोल्हे यांचा प्रचार करताना दिसत होते. एकूणच नेते मंडळी जरी आढळरावांच्या दिमतीला दिसत होती तरी कार्यकर्ते मात्र, कोल्हेंच्या बाजूने दिसले.
शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हे यांना कसे निवडून येतो बघतोच असे आव्हान दिले होते. हेदेखील शिरूरमधील जनतेला रुचले नाही. याशिवाय खेड, जुन्नर, आंबेगाव सुजलाम् सुफलाम् करण्यामागे शरद पवार यांची मोठी पराकाष्टा आहे. त्यामुळे येथील अनेक मंडळी शरद पवारांच्या संपर्कात होती. पक्षफुटीनंतर या भागात शरद पवार यांनी पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्याने मोट बांधली. त्याला काँग्रेससह, उद्धव ठाकरे गट व अन्य घटक पक्षांची साथ मिळाली. शरद पवारांना जनतेत असलेली सहानुभूती तसेच घटक पक्षांनी पाळलेला आघाडी धर्म या सर्वांचा फायदा मिळाल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठे मताधिक्य खेचून आणले.