बंधारे दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मागितले असून, नादुरुस्त बंधारे लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे. मदनवाडी, पोंधवडी, अकोले, काझड, शिंदेवाडी आणि पिंपळे गावातील बंधारे दुरुस्त होणार असल्याने या गावांतील शेतीला फायदा होणार आहे. मदनवाडी गावातील पाच बंधारे दुरुस्त केले जात असल्याने सर्वाधिक फायदा मदनवाडी गावाला होणार आहे.
भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील सोळा बंधारे दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिले. मागील वर्षी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. याबरोबरच अनेक ठिकाणी बंधारे वाहून गेले, तर अनेक ठिकाणी बांध आणि शेतही वाहिल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी नादुरुस्त बंधाऱ्यांची पाहणी करून माहिती मागितली आहे. लवकरच हे बंधारे दुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांना या वर्षी पडलेल्या पावसाचे पाणी पिकांसाठी फायदेशीर होणार आहे, असेही बंडगर यांनी सांगितले.