पिंपरी : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंडवाल चौक, देहूगाव येथे २६ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
प्रकाश बाबुराव हरकळ, असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश यांची बहीण बेबीसरोज विलास डोके (वय ३०, रा. परभणी) यांनी मंगळवारी (दि. १) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश यांची पत्नी सिंधू प्रकाश हरकळ, सासरे किसन नामदेव शिंदे, सासू राधाबाई शिंदे, मेहुणा संदीप शिंदे, दामोदर शिंदे (सर्व रा. खालापूर, मूळ रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मयत प्रकाश हरकळ हे संरक्षण दलात नोकरीला होते. प्रकाश आणि सिंधू यांचा विवाह झाला. विवाहानंतर पत्नी सिंधू आणि तिच्या माहेरच्या लोकांनी प्रकाश यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. तसेच फारकतीसाठी १० लाख रुपये देण्याची मागणी केली. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. या त्रासाला कंटाळून प्रकाश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार २६ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संजय डमाळ तपास करीत आहेत.