कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशन कंपनीच्या माध्यमातून स्वत:चे व्यासपीठ निर्माण केले. मात्र, कोरोनावर ऑनलाईन परीक्षा हा मार्ग नाही. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन वर्षभर झाले पाहिजे. तसेच एमसीक्यू स्वरूपातील परीक्षांद्वारे केवळ दहा टक्क्यांपर्यंत मूल्यमापन हावे, या दृष्टीने विद्यापीठातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम सुरू आहे. महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू झाली तरी विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात येणार आहेत का? याबाबत शंका आहे. त्यामुळे हाय प्लेक्स, हायब्रिड आणि पूर्णपणे ऑनलाईन या तीन्ही पध्दतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करता येईल का? याबाबत विचार केला जात आहे.
विद्यापीठातर्फे नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले असून पुढील काही महिन्यात विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम व कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम करतानाच विद्यार्थ्यांनी अनेक कौशल्य ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करून घेता येतील. त्यात ज्वेलरी डिझाईन, सेल्स एक्झिकेटिव्ह, म्युझिअम क्युरेटर, आयुर्वेदिक मसाज आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठासाठी संशोधन महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठे एकत्र येत नाहीत तोपर्यंत समाजाभिमुख संशोधन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे एनसीसीएस, आयुका, जीएमआरटी, सी-डॅक यांना बरोबर घेऊन संशोधनाचे काम सुरू केले आहे. पूर्वी या संस्थांमध्ये केवळ पीएच.डी. केंद्र होते. मात्र, आता या संस्था व विद्यापीठ यांनी एकत्र येऊन संशोधनाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्यास सुरूवात केली आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (शब्दांकन- राहुल शिंदे)
-------------------
विद्यापीठाचे नवीन अभ्यासक्रम
१) विद्यार्थ्यांसाठी ज्वेलरीशी निगडित अभ्यासक्र विद्यापीठाने सुरू केला. या अभ्यासक्रमात केवळ थेअरी शिकवून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षिकही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्वेलरी काऊंन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्वेलरी हाताळण्याची संधी मिळणार आहे. तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांच्या रोजगाराची जबाबदारी काऊंन्सिलकडून घेण्यात आली आहे.
२) एका नामांकित चार चाकी वाहन निर्मिती करणा-या कंपनीबरोबर लवकरच करार केला जाणार आहे. त्यामुळे शो-रूम मध्ये वाहनांची माहिती देण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी ‘सेल्स एक्झिकेटिव्ह’चा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असेल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शो-रूम मध्ये जाऊन त्यासाठीचे प्रशिक्षण घेता येईल.
३) पुण्याचे वैभव असलेल्या राजा केळकर संग्रहालयाबरोबर विद्यापीठाने नुकताच करार केला आहे. म्युझिअम क्युरेटरसह, म्युझिअमचे संवर्धनासह इतर अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या अभ्यासक्रमात संग्रहालयामध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेऊन हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
४) केरळ मधील काही तरूण महाराष्ट्रात येऊन आयुर्वेदिक मसाज करतात. अनेक मसाज पार्लर येथे सुरू झाले आहेत. त्याला आयुर्वेदिक व शास्त्रीय आधार असल्याने विद्यापीठातर्फे सुध्दा मसाज पार्लरचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
५) समाजामध्ये विद्यापीठ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांचे विषय लक्षात येत नाहीत. त्यामुळे समाजाच्या समस्या सुटतात तसेच इतरांनाही रोजगार मिळतो. विद्यापीठ नाविन्यपूर्ण कल्पनांच्या आधारावरील ‘स्टर्टअप’च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील आहे. इलेक्टिकल मोबेलिटी, हेल्थ केअर , इंडट्री ४.०, आदी क्षेत्रातील स्टर्टअपवर काम सुरू आहे.
----------------