पिंपरी : मराठा आंदाेलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही, असा खुलासा शनिवारी देहू संस्थानने केला. देहू संस्थान जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले.
लोणावळ्याजवळ कार्ला फाटा येथे शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळमधील मराठा आंदोलक देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, सकल मराठा समाज मोर्चाचे समन्वयक अमोरे ढोरे उपस्थित होते. जरांगे-पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थानकडून व्यक्त करण्यात आला.
जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे, असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे आपण देहूतून आलो आहे, असेही बारस्कर यांनी सांगितले. त्यावर आता संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नाही’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. देहू संस्थान जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले.