लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यास चक्रीवादळानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह कमजोर पडल्याने गेल्या ३ दिवसांत मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाचा ३१ मेचा अंदाज आता लांबणीवर पडला आहे. ३ जूनपर्यंत मॉन्सूनचे केरळला आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचे केरळला आगमन ३१ मे रोजी होईल, असा अंदाज १४ मे रोजी वर्तविला हाेता. हा अंदाज वर्तवितानाच त्यात ४ दिवसांचा फरक पडू शकतो, असे सांगितले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ निर्माण झाले होते. या चक्रीवादळाने सर्व बाष्प खेचून घेतले. त्यामुळे मॉन्सूनचे वारे कमकुवत झाले. मॉन्सूनचे २७ मेपर्यंत श्रीलंकेचा अर्धा भाग, अंदमान, निकोबार तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भागात आगमन झाले होते. त्यानंतर गेल्या ३ दिवसांत मॉन्सूनची पुढे वाटचाल झाली नाही. रविवारी मॉन्सनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. १ जूनपासून मोसमी वारे पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे वाटचाल करून ३ जूनपर्यंत त्याचे केरळला आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत जुन्नर ५६, पुणे २५, ब्रह्मपुरी, बुलढाणा १८, वेंगुर्ला ९, औरंगाबाद ६, दाभोलीम ५, सातारा, ५, जळगाव ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.