मंचर : मंचर शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे नगरपंचायत होऊ शकली नाही. त्यामुळे मंचर शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी केला.
मंचर येथे भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी किसान मोर्चा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय थोरात, तालुका भाजप अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, उपाध्यक्ष भाजप पुणे विजय पवार, मंचर शहर अध्यक्ष नवनाथ बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, विकास बाणखेले, सोनल काळे, स्नेहल चासकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
एरंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आश्वासने देऊनही मागील सहा महिन्यांत मंचर येथे नगरपंचायत करू शकले नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच माळेगाव, देहूगाव येथे नगरपरिषद करून दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारने मंचर ग्रामस्थांची दिशाभूल करून विकासाचे गाजर दाखवले. राष्ट्रवादी व शिवसेनेला शहरात नगरपंचायत होऊनच द्यायची नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र मंचर ग्रामपंचायतीमध्ये तिजोरीत खडखडाट असल्याने मंचर शहराचा विकास खुंटला आहे.
डॉ. ताराचंद कराळे म्हणाले, मंचर व घोडेगाव या दोन्ही गावांचा नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठवून अनेक वेळा सर्वांनी पाठपुरावा केला. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या श्रेयवादामुळे मंचर शहराची नगरपंचायत होणे थांबले आहे. महाविकास आघाडी लोकांच्या भावनेशी खेळ करत असून नागरिकांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सेवा देण्यास ग्रामपंचायत कमी पडली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास आंबेगाव भाजपच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.
संजय थोरात म्हणाले की मंचर शहरात महाविकास आघाडी होऊन नागरिकांचा तोटा झाला आहे. यांच्या हातात राज्याची सत्ता असूनही मंचर शहराचा विकास थांबला आहे. मंचर शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर असून यांना ती चालू करता आली नाही. तर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग असून वेळेवर पाणी मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.